( लांजा /प्रतिनिधी )
तालुक्यातील गवाणे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गोविंद विठ्ठल करंबेळे यांची सन २०२६-२७ या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेने त्यांच्या मागील दोन वर्षांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. गवाणे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २१ ऑगस्ट रोजी पार पडली. या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविल्याबद्दल गोविंद करंबेळे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर २०२६-२७ या वर्षासाठी त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली.
करंबेळे यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांत गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन, शासनाच्या विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तंटे सामोपचाराने मिटविताना गावातील सामाजिक सलोखा आणि परस्परांतील बंधुभाव टिकविण्यासाठीही समितीने महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत २००७ मध्ये समितीची स्थापना झाल्यापासून गोविंद करंबेळे यांनी तब्बल सहा वर्षे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. गावातील विविध प्रश्नांवर सामोपचाराने तोडगा काढण्यासह सामाजिक उपक्रमांना चालना देण्यात त्यांच्या कार्याचा वाटा राहिला आहे.
गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र आकाराम कोटकर हे तंटामुक्त समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. गावातील कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील म्हणून ते सातत्याने सकारात्मक भूमिका बजावत आहेत. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील किरकोळ वादांना योग्य वेळी सामोपचाराची दिशा देणे, ग्रामस्थांमध्ये परस्पर विश्वास वाढविणे आणि गावातील शांततामय वातावरण कायम ठेवणे यासाठी सचिव म्हणून त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अध्यक्ष गोविंद करंबेळे आणि सचिव रविंद्र कोटकर यांच्या समन्वयातून तंटामुक्त समितीचे काम अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, समितीच्या कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांनी भारताच्या संविधानाची प्रत देऊन नूतन अध्यक्ष व समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी गवाणे गावचे सरपंच भिमराज कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच मुकुंद करंबेळे, सुरेश करंबेळे, राजा रेवाळे, आनंद कांबळे, किरण कांबळे, संतोष कांबळे, भागोजी कांबळे, चंद्रमणी कांबळे, चंद्रकांत रामाने, गणपत रामाने, सुभाष रामाने, पोलीस पाटील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका शिक्षक आदी उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी गोविंद करंबेळे यांच्यासह नूतन तंटामुक्त समितीचे अभिनंदन केले. गावातील वाद-विवादांना सामोपचाराची वाट दाखवून सामाजिक ऐक्य अधिक बळकट करण्याची जबाबदारी आता नूतन समितीसमोर आहे.

