( लांजा / वार्ताहर )
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात आज (शनिवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार निर्माण झाला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढले आणि कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. वाकेड घाटातून प्रवास सुरू असताना कारला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारला वेढले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि ती जळून खाक झाली. कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


