(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि मद्यप्राशनातून होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून लांजा आणि मंडणगड तालुक्यातील स्वतंत्र कारवायांमध्ये पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लांजा तालुक्यातील कुवे-निवळेवाडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मंगेश विठ्ठल गुरव (वय ४५) याच्याकडून गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. तर पालू-गाडेवाडी येथे चंद्रकांत तुकाराम चव्हाण (वय ५५) याच्याकडे सुमारे नऊ लिटर गावठी दारू आढळून आल्याने त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच मंडणगड तालुक्यातील कुंबळे गावात समीर सत्यवान गायकवाड (वय ३५) याच्याकडून देशी दारूच्या नऊ बाटल्या जप्त करण्यात आल्या. अवैध मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याचवेळी मंडणगड बाजारपेठ परिसरात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी योगेश परशुराम काप (वय ३६) आणि जिगर सूर्यकांत सालेकर (वय ४१) यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अवैध मद्यनिर्मिती, साठा आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, या मोहिमेमुळे मद्यव्यवसायाशी संबंधित बेकायदा कृत्यांवर काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

