(गुहागर)
तालुक्यातील श्रृंगारतळी येथे सोमवारी सकाळी घडलेल्या एका अनपेक्षित प्रकाराने गावात खळबळ उडाली. स्थानिक बेकरीमधून आणलेला पेढा खाल्ल्यानंतर ज्वेलरीच्या दुकानात काम करणाऱ्या तब्बल ११ महिलांना अचानक चक्कर येणे, मळमळ व उलट्या होण्याची लक्षणे दिसू लागली. तातडीने उपचारासाठी सर्वांना श्रृंगारतळीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागील इमारतीत असलेल्या या ज्वेलरी वर्कशॉपमध्ये मुंबईहून आणलेले साहित्य वापरून स्थानिक महिला दागिने तयार करतात. श्रावण सोमवारच्या निमित्ताने काम करणाऱ्या एका महिलेने सकाळी सुमारे अकराच्या सुमारास बेकरीतून पेढे आणले व प्रत्येक सहकाऱ्याला अर्धा पेढा दिला. काही मिनिटांतच महिलांची तब्येत बिघडू लागली.
विषबाधा झालेल्यांमध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी आणि मानसी शिगवण यांचा समावेश असून त्या तळवली, मळण आणि पालपेणे या गावांतील रहिवासी आहेत. प्रसाद म्हणून खाल्लेल्या पेढ्यातूनच विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. उपचार करणारे डॉ. राहुल चव्हाण यांनी सर्व रुग्णांची प्रकृती सध्या समाधानकारक असल्याची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता.

