(गुहागर)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथे सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत महिला बचत गटांसाठी धिंगरी अळिंबी उत्पादन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व बचत गटांच्या महिलांनीही महापुरुषांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या दूरदृष्टी आणि शिवरायांच्या घडणीत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन तरुणांनी आणि महिलांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर नलावडे मशरूम फार्मचे मालक हृषिकेश नलावडे आणि गौरव नलावडे यांनी धिंगरी अळिंबी उत्पादनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. पीपीटीच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया, आवश्यक साहित्य, खर्च-नफा गणित, तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अळिंबी लागवडीची माहिती देण्यात आली. अळिंबीविषयी असलेले समज-गैरसमज, शाकाहारी-मांसाहारी वाद, बाजारपेठेतील संधी, विक्री व मार्केटिंग रणनीती, तसेच कृषी व शेतीविज्ञानाशी संबंधित मुद्द्यांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी सुमारे ६० ते ७० बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, संगणक परिचालक साईस दवंडे, बचत गटांच्या सीआरपी श्रुती कदम तसेच इतर महिलांनी मोलाचे सहकार्य केले. हा उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल ठरला.

