(गुहागर / सचिन कुळये)
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ नुकत्याच वरदान हायस्कूल, पालपेणे (ता. गुहागर) येथे पार पडल्या. या स्पर्धेत ५० मीटर धावणे (लहान गट – मुली) या क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मासू नं. १ येथील इयत्ता पाचवीतील अनुष्का मंगेश आलीम हिने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला.
यापूर्वी झालेल्या केंद्रस्तरीय व बीटस्तरीय स्पर्धांमध्येही अनुष्काने प्रथम क्रमांक पटकावत सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामविकास मंडळ, मुंबई मंडळ, मुख्याध्यापक रवींद्र कुळये, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे. शाळेचे माजी विद्यार्थी प्रविण अनंत मास्कर व विशाल मास्कर यांनी अनुष्काला ₹२००० चे बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले आहे.
पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी अनुष्काला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

