(गुहागर / रामदास धो. गमरे)
गुहागर तालुक्यातील वरवेली गावची कन्या कु. निधी राजेश पवार हिने कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशभरातून २४ वा क्रमांक मिळवून मोठे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीने कुटुंब, गाव तसेच समाजाचा मान उंचावला आहे.
निधी ही बौद्धजन सहकारी संघ, मौजे वरवेलीचे मुंबई शाखा अध्यक्ष व बौद्धजन पंचायत समिती, वरळी विभागाचे गटप्रतिनिधी तसेच शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांची कन्या आहे. शिवडी येथील जेतवन बुद्धविहारात झालेल्या बौद्धजन सहकारी संघाच्या कौन्सिल बैठकीत ही आनंदवार्ता समजताच अभिनंदनाचा ठराव पारित करून निधीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
कंपनी सेक्रेटरी हे पद कोणत्याही मोठ्या कंपनीचे Key Managerial Personnel (KMP) मानले जाते. कंपनी कायदा, सेबीचे नियम, कर कायदे, बँकिंग व आर्थिक क्षेत्रातील विविध कायद्यांचे पालन यासाठी कंपनी सेक्रेटरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. केवळ प्रशासकीय अधिकारी न राहता, कंपनी पारदर्शक, कायदेशीर आणि जबाबदार पद्धतीने चालवली जावी यासाठी तो आधारस्तंभ ठरतो.
अशा महत्वाच्या आणि आव्हानात्मक परीक्षेत देशभरातून २४ वा क्रमांक पटकावणाऱ्या कु. निधी राजेश पवार हिला बौद्धजन सहकारी संघ (गाव व मुंबई), बौद्धजन पंचायत समिती, नातेवाईक, वरवेली ग्रामस्थ, मित्रपरिवार व तमाम आंबेडकरी समाजाकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना व्यक्त करण्यात येत आहेत.

