(ठाणे)
ठाणे पोलीस दलातील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ४ ऑगस्ट रोजी सात न्यायबंदींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्याच्या प्रक्रियेदरम्यान गंभीर नियमभंग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची हेतुपुरस्सर दिशाभूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
ठाणे पोलीस मुख्यालयातील या नऊ कर्मचाऱ्यांची न्यायबंदी आणण्याची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, साध्या वेशात तपासणीसाठी आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने रुग्णालयात पाहणी केली असता सातपैकी दोन कैदी उपस्थित नसल्याचे आढळले. चौकशीत उघड झाले की हे दोन्ही कैदी फरार झाले नव्हते, तर त्यांना अन्य एका ठिकाणी नेण्यात आले होते, जे नियमबाह्य होते.
संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कैदी एक्स-रे रूममध्ये किंवा स्वच्छतागृहात असल्याची खोटी माहिती दिली. वारंवार टाळाटाळ करणाऱ्या उत्तरांमुळे अधिकाऱ्यांचा संशय वाढला आणि अखेर दोन्ही कैदी पुन्हा सापडले. त्यांना तात्काळ ठाणे मध्यवर्ती कारागृहात परत आणण्यात आले.
या गंभीर प्रकारानंतर पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी संबंधित नऊ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

