(पुणे)
पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे 3.30 वाजता निधन झाले. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी 4 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात सहा वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून सेवा बजावली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकीर्द सुरू केली.
ते पुण्याचे दीर्घकाळ खासदार होते. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. विशेष बाब म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असतानाही रेल्वे बजेट सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली.
पुणे शहराच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. विमानतळ विकास, मेट्रो प्रकल्प तसेच विविध पायाभूत सुविधा उभारणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या प्रभावी राजकीय पकडीमुळे आणि प्रशासकीय निर्णयक्षमतेमुळे त्यांना पुण्याचे ‘कारभारी’ अशी ओळख मिळाली.
क्रीडा प्रशासनाच्या क्षेत्रातही कलमाडी यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. 1996 ते 2011 या काळात त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघाचे अध्यक्षपद भूषवले. 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मात्र, या स्पर्धांच्या खर्च आणि कंत्राटांवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 2011 मध्ये सीबीआयने त्यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडूनही तपास झाला. मात्र, पुरावे अपुरे असल्याने 2025 मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि न्यायालयाने तो स्वीकारला.
या प्रकरणानंतर काही काळ त्यांची राजकीय सक्रियता कमी झाली होती. मात्र, क्लोजर रिपोर्टनंतर त्यांची प्रतिमा पुन्हा सुधारू लागली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुणे महापालिकेला दिलेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती. पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून सुरेश कलमाडी यांचे नाव कायम स्मरणात राहील.

