(मुंबई)
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पाचवी आणि आठवी बरोबरच आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
स्थानिक शाळांसाठी दिलासा
बहुतांश ग्रामीण भागातील शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच मर्यादित असतात. २०१६ पासून शिष्यवृत्ती परीक्षा फक्त पाचवी आणि आठवीसाठी घेतली जात असल्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होता येत नव्हते. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात नाराजी होती आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची संधीही हरवत होती. काही शिक्षक संघटनांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत शिष्यवृत्ती परीक्षेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या घटत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शिष्यवृत्ती रकमेतील वाढीचा विचार
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सध्या शिष्यवृत्ती रक्कम मिळत नाही. त्यामुळे या रकमेतील वाढ आणि वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एका कार्यक्रमात दिली.

