(नवी दिल्ली)
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७९ वर्षे पूर्ण झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त झालेला भारत आज आत्मनिर्भर, सुरक्षित आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२व्या वर्षी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकावला आणि संपूर्ण राष्ट्राला उद्देशून ९८ मिनिटांचे भाषण दिले.
या वर्षी स्वातंत्र्यदिनाची संकल्पना ‘न्यू इंडिया’ ही असून, १४० कोटी देशवासीयांच्या सहभागातून नवभारत घडवण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून मांडला. भाषणात त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, ऑपरेशन सिंदूरचे यश, आर्थिक प्रगती आणि कल्याणकारी योजनांचा विस्तार यावर विशेष भर दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’ला १०० दिवस पूर्ण
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी १०० दिवसांचा गौरव करताना सांगितले की, हे ऑपरेशन केवळ शौर्याचे नव्हे, तर भारताच्या नव्या सुरक्षा धोरणाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या कारवाईने भारताचा आत्मविश्वास अधिक दृढ केला असल्याचे ते म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून १२ व्यांदा राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी त्यांच्या भाषणात ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आज मला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारचा नरसंहार केला. त्यांचा धर्म विचारून लोक मारले गेले.
ते पुढे म्हणाले, ‘संपूर्ण भारत संतापाने भरला होता. या हत्याकांडाने संपूर्ण जग हादरले होते. ऑपरेशन सिंदूर ही त्या क्रोधाची अभिव्यक्ती आहे. आम्ही सैन्याला मोकळीक दिली. आमच्या सैन्याने असे काही केले जे अनेक दशकांपासून विसरता येणार नाही. त्यांनी शत्रूच्या हद्दीत शेकडो किलोमीटर घुसून दहशतवाद्यांचा नाश केला. पाकिस्तान नुकताच झोपेतून जागा झाला आहे. पाकिस्तानमधील विध्वंस इतका मोठा आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत.’
मोदी म्हणाले, ‘महत्त्वाच्या खनिजांमध्ये स्वावलंबन आपल्यासाठीही आवश्यक आहे. संरक्षण असो, तंत्रज्ञान असो, वैद्यकीय असो, ते महत्त्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. १२०० हून अधिक ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. महत्त्वाच्या खनिजांच्या दिशेने आपण पुढे जात आहोत.’
भारत आता अणुहल्ल्यांच्या धमक्या सहन करणार नाही
“अणुहल्ल्याचे ब्लॅकमेलिंग बऱ्याच काळापासून सुरू आहे, पण आता ते सहन केले जाणार नाही. जर आपले शत्रू असे प्रयत्न करत राहिले तर आपले सशस्त्र दल त्यांच्या स्वतःच्या अटींवर, त्यांच्या निवडीच्या वेळी आणि त्यांनी ठरवलेले उद्दिष्ट साध्य करून प्रत्युत्तर देतील. आम्ही योग्य उत्तर देण्यास तयार आहोत,” असे पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावले. भारताने ठरवले आहे की ते आता अणुहल्ल्याचे धोके सहन करणार नाही, आम्ही कोणती धमकीही सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.
कडेकोट बंदोबस्त
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ११,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी आणि ३,००० वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. लाल किल्ल्याच्या परिसरातील उंच इमारतींवर स्नायपर्सची तैनाती, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षा व्यवस्थेत कसोशीने दक्षता बाळगण्यात आली. उंच इमारतींवर स्नायपर्स ठेवण्यात आले आहेत आणि परिसरात बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. सुरक्षेसाठी अनेक आधुनिक तंत्रांचा वापर केला जात आहे. हवामान विभागाने दिल्लीत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती.
देशभरात तिरंग्याचा उत्सव; एकात्मतेचा जयघोष
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज १४० कोटी भारतीय तिरंग्याच्या रंगात रंगलेले आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यात, मग ते वाळवंट असो, हिमालयाची शिखरे असोत, अथवा समुद्रकिनारे, प्रत्येक ठिकाणी फक्त एकच घोषणा घुमत आहे, मातृभूमीच्या स्तुतिसाठी जीवही अर्पण करायला तयार.”
७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रगतीचा आढावा घेत, ‘न्यू इंडिया’च्या दिशेने प्रत्येक नागरिकाला सामील होण्याचे आवाहन केले. त्यांचे भाषण केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, यामध्ये देशाच्या सुरक्षा, विकास आणि एकात्मतेचा ठाम विश्वास ठळकपणे दिसून आला.

