( रत्नागिरी )
देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मॅजेस्टिक फ्युचर हब इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक निलेश सावे, कणकवली कॉलेज युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. आशिष नाईक, राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा सुवर्णपदक विजेते विवेक वारभुवन आणि प्रसिद्ध अभिनेते निलेश पवार, प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक राखी साळगावकर, विज्ञान विभाग प्रमुख घाणेकर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड उपस्थित होते.
प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे, असे सांगितले.
निलेश सावे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरित करत आत्मचिंतनाची आवश्यकता स्पष्ट केली.
निलेश पवार यांनी ‘आवाजावर प्रभुत्व कसे मिळवावे’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की व्यक्तिमत्व विकासामध्ये केवळ बाह्य रूप महत्त्वाचे नसून आवाज, बोलण्याची शैली आणि आत्मविश्वास यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.आवाज आणि संवाद: स्पष्ट उच्चार, योग्य शब्दप्रयोग आणि आवाजातील चढ-उतार संवाद अधिक प्रभावी करतात.आत्मविश्वास: आवाजातील ठामपणा व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतो. आवाजाच्या सरावात नियमित श्वसन व्यायाम, वाचन आणि बोलण्याचा सराव आवश्यक आहे. अभिनय, सूत्रसंचालन आणि सार्वजनिक जीवनात स्पष्ट व प्रभावी आवाज यशाचे दार उघडतो.
विवेक वारभुवन यांनी प्रभावी वक्तृत्वासाठी आवश्यक घटक जसे की विषयाची सखोल तयारी, आत्मविश्वास, योग्य देहबोली, वेळेचे भान आणि प्रभावी शब्दप्रयोग यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले. या कार्यशाळेला तांत्रिक सहाय्य साईप्रसाद पवार, अभिषेक रहाळकर व प्रा.विनय कलमकर यांचे लाभले.कार्यशाळेचे सुत्रसंचलन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले.

