(चिपळूण)
कोकणातील लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा शिमगा उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरू झाला आहे. गावोगावी ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि ग्रामदैवतांच्या पालख्यांमुळे संपूर्ण परिसर उत्सवी रंगात न्हाऊन निघाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावाला भेट देत ग्रामस्थांसोबत शिमगा उत्सवात सहभाग घेतला. ग्रामदेवता श्री शारदादेवी यांच्या पालखीला खांदा देत त्यांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य केले. आमदार जाधव यांच्या सहभागामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरण
पालखी मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा निनाद आणि ‘शारदामातेच्या जयघोषा’ने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. या वेळी आमदार जाधव यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव तसेच योगेश जाधव, सिद्धेश जाधव आणि सुहास जाधव हेही उत्सवात सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी जाधव कुटुंबीयांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
शिमगा हा केवळ सण नसून कोकणातील सामाजिक ऐक्य, परंपरा आणि सामूहिक आनंदाचे प्रतीक असल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे तुरंबव गावात आनंदी आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

