(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“शिक्षणाला वयाची मर्यादा नसते” या उक्तीचं जिवंत उदाहरण ठरवत तळवडे (बौद्धवाडी) येथील ७२ वर्षीय रमेश बेंडूराम कदम यांनी मुंबई विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स या विषयातील एम.ए. पदवी मिळवून शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
शेतकरी कुटुंबातील सुपुत्र असलेल्या रमेश कदम यांचा जन्म वडील बेंडूराम लक्ष्मण कदम आणि आई यशोदा बेंडूराम कदम यांच्या पोटी झाला. बी.कॉम पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यात नोकरीला सुरुवात केली आणि अखेर क्लास वन अधिकारी (आयपीएस) म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवेत असतानाच त्यांनी L.L.B, G.D.C.&A. या पदव्या प्राप्त केल्या.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा शैक्षणिक प्रवास थांबला नाही. त्यांनी L.L.M, PG DCP (in DBAT.HR), DLL & LW अशा पदव्या मिळवल्या. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असून, निवृत्तीनंतर त्यांनी पॉलिटिकल सायन्स या विषयातून एम.ए. करण्याचा ध्यास घेतला. प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मे २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत ५६.१८ टक्के गुणांसह ते उत्तीर्ण झाले.
तळवडे गावातील सर्वाधिक शैक्षणिक पदव्या मिळविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून रमेश कदम यांचा अभिमान सर्व गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकरी, नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

