(मुंबई)
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुरज चव्हाण यांचे पुन्हा एकदा पक्षात पुनर्वसन करण्यात आले आहे. याआधी युवक प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले सुरज चव्हाण यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे.
बुधवारी (१३ ऑगस्ट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सुरज चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. मात्र या नेमणुकीनंतर विरोधकांकडून तसेच छावा संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि विशेषतः अजित पवार यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, “माझ्यावर झालेल्या मारहाणीस अवघा एक महिना झाला असताना सुरज चव्हाण यांना पदोन्नती देणे योग्य आहे का? ज्या व्यक्तीविरोधात अजित पवार यांनी ‘अशा व्यक्तींना पक्षात स्थान नाही’ असं जाहीरपणे म्हटलं होतं, त्यांनाच आता पुन्हा पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जात आहे. याचा अर्थ अजित पवार यांच्या भूमिकेला पक्षात किंमत राहिलेली नाही का?” शिवाय घाडगे यांनी इशारा दिला की, “सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही. छावा संघटना त्यांचा ठाम विरोध करेल.” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
सुरज चव्हाण यांचे पुनर्वसन हे पक्षांतर्गत संघर्षाचे आणि नेतृत्वातील मतभेदांचे प्रतीक बनत चालले आहे. एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना नवीन जबाबदारी दिली जात असताना, दुसरीकडे त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्या जात असल्याचे चित्र उभे राहत आहे.
काय आहे प्रकरण
पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दरम्यान, लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले. यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली. विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा-बुक्क्यांपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

