(मुंबई)
‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्र सरकारने एक महिन्यासाठी स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून त्यांना ही सूचना प्राप्त झाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही संवादांवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून प्रदर्शन स्थगित करण्याची शिफारस केली होती.
विशेष म्हणजे, ‘खालिद का शिवाजी’ याच चित्रपटाची शिफारस महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागानेच फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केली होती. आज ( ८ ऑगस्ट रोजी) हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी साडेचार वाजता दिग्दर्शकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर, मंत्रालयाने प्रदर्शन स्थगितीचा निर्णय घेतला.
शेलार यांचे स्पष्टीकरण
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे प्रदर्शन माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि संभाव्य सामाजिक परिणामांबाबत व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.”
शेलार यांनी स्पष्ट केले की, चित्रपट प्रमाणन अधिनियम, 1952 च्या कलम 6(2) अंतर्गत हे प्रमाणपत्र तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. विशेषतः येणाऱ्या दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
रोहित पवार यांची टीका
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत विचारले की, “आपण याच चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्तुती केली होती. आपल्या विभागाने तपासून हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी शिफारस केला, मग आता अचानक हा विरोध का?”
पवार पुढे म्हणाले, “फक्त काही संघटनांच्या विरोधामुळे सरकारने प्रदर्शनाच्या आदल्याच दिवशी दिग्दर्शकाला नोटीस पाठवणं दुर्दैवी आहे. एखाद्या चित्रपटावर अनेकांचे भविष्य अवलंबून असते. आपण या दबावाला बळी न पडता दिग्दर्शकाच्या पाठीशी उभे राहावे.”

