(मुंबई)
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असून, परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी पर्यायी कर्मचारी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. आधी ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, मतमोजणी ९ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशातील सर्व कार्यरत शिक्षकांना ठरावीक कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी सी-टीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. ही परीक्षा ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होत आहे.
मतदानाची सुधारित तारीख आणि सी-टीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक शिक्षकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. निवडणूक कर्तव्य लागल्यास परीक्षेला उपस्थित कसे राहायचे, असा प्रश्न शिक्षक वर्गात उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दखल घेत सी-टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

