( रत्नागिरी / वार्ताहर )
‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेत अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम, तर देशात चौथा क्रमांक मिळवत रत्नागिरीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या शहरातील विश्वनगर येथील भावेश सुरेश चव्हाण याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भावेशच्या उल्लेखनीय यशाची दखल घेत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन शाल आणि वृक्षारोपणाचा संदेश देणारे रोप भेट देत त्याचा गौरव केला. यावेळी भावेशच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्याच्या यशामागील योगदानाबद्दल त्याच्या आई-वडिलांचाही सन्मान करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर तसेच उपशहर प्रमुख सलील डाफळे उपस्थित होते.
यावेळी प्रशांत साळुंखे यांनी भावेशचे अभिनंदन करताना सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. भावेशची जिद्द, मेहनत आणि चिकाटी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भावेश चव्हाण यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याला दिले. भविष्यात एक कुशल आणि संवेदनशील डॉक्टर बनून समाज व देशाची सेवा करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

