(मथुरा / प्रतिनिधी)
भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवर्धन नगरीत आज गुरुवारी सायंकाळी श्रीमद् भागवत ग्रंथाची महामिरवणूक काढण्यात येणार आहे तर उद्या शुक्रवारपासून भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरण प्रारंभ होत आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे याचि देही याचि डोळा साक्षीदार होण्यासाठी हजारो सेवेकरी मंगळवारपासूनच कार्यक्रम स्थळी दाखल होऊ लागले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनवासियांच्या रक्षणासाठी हाताच्या करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी २७ जून ते ४ जुलै २०२५ या काळात कार्ष्णि आश्रमाच्या भव्य मैदानावर भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.भगवान श्रीकृष्णाने निजधामाला जाताना आपली सारी शक्ती भागवत ग्रंथात समाविष्ट केली असल्यामुळे हा ग्रंथ आणि हा सारा परिसर अतिउच्च स्पंदनांनी भारलेला आहे. अशा विलक्षण अद्भुत चैतन्यदायी वातावरणात शब्दाशब्दात प्रचंड तेज असलेल्या श्रीमद् भागवत या दिव्य ग्रंथाचे सेवेकरी पारायण करणार आहेत. राष्ट्रावरील अरिष्टे टळावीत त्याचबरोबर समस्त सेवेकरी परिवाराचे आणि समाजाचे कल्याण व्हावे या उदात्त भावनेतून सेवामार्गातर्फे गोवर्धन येथे ही सर्वोच्च सेवा आयोजित करण्यात आली आहे.
आज सायंकाळी निघणार महामिरवणूक..
गोवर्धन नगरीत भगवान श्रीकृष्णाचे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानापासूनच गोवर्धन पर्वताच्या परिक्रमेला प्रारंभ होतो. हे ठिकाण बडा परिक्रमा मार्ग या नावाने परिचित आहे. याच ठिकाणापासून आज सायंकाळी ५:३० वाजता कार्ष्णि आश्रमापर्यंत श्रीमद् भागवताची महामिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक कार्ष्णि आश्रमाच्या सभा मंडपापर्यंत निघणार आहे.
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचे मार्गदर्शन..
मिरवणूक सभामंडपात आल्यानंतर गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे समस्त सेवेकरी परिवाराला संबोधित करतील. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. आज सायंकाळी महामिरवणूक निघाल्यानंतर उद्या शुक्रवारपासून सप्ताहाला प्रारंभ होणार असल्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.