(रायगड)
जिल्ह्यातील पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे रायगड पोलिस दलातील कर्मचारी रुपेश पांडुरंग भोनकर (वय ५०) यांचा मत्स्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१९) च्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना अंतोरे रेल्वे पुलाजवळ घडली. मत्स्यगंधा एक्स्प्रेस मुंबईहून मंगळूरकडे जात असताना भोनकर यांना जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्यांचे शरीर अक्षरशः छिन्नविछिन्न झाले होते.
अपघातानंतर त्यांना तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, पुढील तपासात मृत व्यक्ती हे रायगड पोलिस दलात कार्यरत असल्याचे समोर आले.