(पिंपरी चिंचवड)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रविवारी (5 एप्रिल) सकाळी सुमारे 7 वाजता ही घटना तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट च्या आवारात घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव विशाल वर्मा (वय 20) असे आहे. तो संस्थेच्या वसतिगृहात राहत होता आणि मूळचा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी होता.
कसा घडला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेच्या आवारात काही विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते. यावेळी विशाल वर्मा बास्केटबॉल रिंगला लटकला असता अचानक रिंग तुटली. त्यानंतर संपूर्ण लोखंडी खांब खाली कोसळला आणि तो थेट त्याच्या अंगावर पडला. या अपघातात विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत असून, कॅम्पसमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बास्केटबॉलच्या संरचनेची नियमित तपासणी झाली होती का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील क्रीडा साहित्याच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी कितपत होते, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर शाळा आणि महाविद्यालयांनी क्रीडा उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभाल करणे अत्यावश्यक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

