( लांजा )
लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे एक २७ वर्षीय तरुण गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव प्रथमेश पर्शुराम मांडवकर (वय २७) असे असून, तो गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याने गुरांच्या गोठ्यातील लाकडी वाशाला दोरी बांधून गळफास घेतला.
घटनेच्या वेळी त्याचे वडील लांजा बाजारात, आई घरीच होती, तर भाऊ पंकज येरवंडे येथे मजुरीसाठी गेला होता. आत्महत्येची माहिती त्याचा भाऊ पंकज मांडवकर (वय ३१) याने लांजा पोलिस ठाण्यात दिली.
प्रथमेश हा स्वभावाने शांत व संयमी असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र त्याने टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेचा पुढील तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे करत आहेत.

