(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील विद्यार्थी, युवक-युवतींनी सोमवारी एकत्र येत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शिक्षणातील पारदर्शकता आणि नीट परीक्षा प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तसेच सोनम वांगचुक, अभिजीत दीपके आणि उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना यावेळी पाठिंबा व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून रुग्णालयात हलवल्याच्या घटनेचाही निषेध आंदोलनकर्त्यांनी नोंदविला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
यावेळी छाया कोकरे, अमर पवार, प्रथमेश गोरे, स्वप्नील कांबळे, तेजस कोकरे, तेजस्विनी कांबळे, अलीशा पवार, पंकज कांबळे, प्रतीक पवार, मंथन पवार, सुबोध जाधव, सौरभ आयरे, वृषाली पालकर, प्राची चव्हाण, पूजा सावंत, सूरज सावंत, श्रेया कांबळे, गायत्री पवार, करुणा कांबळे, वंश आयरे, सांची दांडगे, अनिकेत कांबळे, रोशनी कांबळे, दिव्या कांबळे, नितेश कांबळे, विनया गमरे, श्रद्धा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक-युवती उपस्थित होते.

