( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
शहरातील गर्दीच्या बाजारपेठेत ग्राहकाचा आव आणत फिरणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका विक्रेत्या महिलेची तब्बल ४० हजार रुपयांची रोकड असलेली पर्स लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विठ्ठल मंदिर परिसरात हा प्रकार घडला असून, बाजारपेठेतील विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयित महिला बाजारपेठेत ग्राहक असल्याचा भास निर्माण करत विविध विक्रेत्यांकडे फिरत होत्या. याच वेळी त्यांनी केळी विक्री करणाऱ्या एका महिलेकडे खरेदीच्या निमित्ताने थांबत दरावरून घासाघीस सुरू केली. मुद्दाम संभाषण वाढवत विक्रेत्या महिलेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात आले. याच संधीचा फायदा घेत टोळीतील एका अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी ठेवलेली पर्स अत्यंत सफाईदारपणे उचलून नेल्याचे सांगितले जाते.
काही क्षणांतच पर्स गायब झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत संशयित महिला गर्दीत मिसळून पसार झाल्या होत्या. विशेष म्हणजे त्या पर्समध्ये नुकतेच पिग्मी खात्यातून काढलेले सुमारे ४० हजार रुपये ठेवले होते. त्यामुळे पीडित महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच दरम्यान परिसरातील अन्य एका फळ विक्रेत्या महिलेकडून एक किलो काजूगरही चलाखीने लंपास करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सलग घडलेल्या या प्रकारांमुळे बाजारपेठेत कार्यरत असलेल्या छोट्या विक्रेत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयित महिलांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

