(रत्नागिरी / प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, अमली पदार्थांविरोधातील जागरूकता, वाहतूक शिस्त, वैयक्तिक सुरक्षितता आणि करिअर नियोजनाबाबत भक्कम जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलिस दलाच्या ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील दोन शाळांमध्ये मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवरील शंकांचे निरसन करून घेतले.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत मुकुल माधव विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी सायबर जागरूकता, ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन, ‘गुड टच–बॅड टच’, स्वसंरक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील धोके, कायद्याचे पालन आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची गरज यावरही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महमुनी यांनी पटवर्धन हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना याच विषयांवर मार्गदर्शन केले. संवादात्मक पद्धतीने आयोजित सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून त्यांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण करणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून देणे, वैयक्तिक सुरक्षितता आणि स्वसंरक्षणाची भावना बळकट करणे तसेच करिअरविषयक योग्य मार्गदर्शनाद्वारे आत्मविश्वासपूर्ण, जबाबदार आणि सक्षम पिढी घडविणे हा आहे. विद्यार्थ्यांना केवळ कायद्याची माहिती देणे नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत सुरक्षित आणि सशक्त भविष्याची पायाभरणी करणे, हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

