(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावचे सुपुत्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे यांना नुकताच “ग्रामरत्न सरपंच” हा सन्मानाचा पुरस्कार लोणावळा येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील निढळ गावचा कायापालट करणारे IAS अधिकारी (उपायुक्त) चंद्रकांत दळवी आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
भडकंबा गाव हे विकासाच्या आघाडीवर जिल्ह्यात विशेष स्थान मिळवणारे गाव आहे. गावामध्ये रस्ते, साकव, पाखाडी यासह नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आले आहेत. दूध संकलन केंद्र, व्यायामशाळा, क्रीडामैदान, ओपन जिम, संगीत विद्यालय अशा अनेक आगळ्यावेगळ्या कामांची अंमलबजावणी झाली आहे. १२ वाडीवस्त्यांमध्ये वसलेले हे निसर्गरम्य गाव ऐतिहासिकदृष्ट्या देखील समृद्ध आहे. गावचे ग्रामदैवत श्री देव केदारलिंग हे स्वयंभू देवस्थान आहे, तर काजळी आणि गडनदीचा संगम गावाला ऐतिहासिक वारसा देतो.
मागील २५ वर्षांपासून बापू शिंदे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सामान्य नागरिक, निराधार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि अपंग व्यक्ती यांच्यासाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या प्रयत्नांतून संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ श्रावणबाळ योजना आणि अपंग पेन्शन योजनांमुळे दरमहा पावणे दोन लाख रुपये गावकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या कार्यात त्यांचे बंधू अतुल शिंदे यांनीही मोलाची मदत केली.
कोविड काळात कामगार कल्याण मंडळाकडून १० लाख रुपयांचे दोन टप्प्यातील सानुग्रह अनुदान, भांडी सेट, सेफ्टी किट यांसारखी मदतही लाभार्थ्यांना मिळवून दिली. याशिवाय रस्ते, काँक्रीट साकव, बंधारे, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा यांसारखी महत्त्वाची कामे मंजूर झाली आहेत. यावर्षी गाव टँकरमुक्त होणार आहे. तसेच नवालेवाडी साठी नवीन अंगणवाडी इमारत व पेठवाडी शाळेसाठी दुसरी RCC वर्ग खोली मंजूर झाली आहे.
भडकंबा गावाच्या विकासासाठी आमदार किरण सामंत, पालकमंत्री उदय सामंत आणि कु. अपूर्वा सामंत यांचे खंबीर पाठबळ लाभले आहे. हाच सर्वंकष अभ्यास करून हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे अखिल भारतीय सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी बापू शिंदे म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून भडकंबा गावातील सर्व नागरिक, ग्रामपंचायतीचे सहकारी आणि कार्यकर्त्यांचा आहे. भविष्यात गावाचा कायापालट आणि जलसमृद्धी पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामपंचायती अभ्यास दौरा घेऊन येतील, असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. यापुढेही अधिक मोठी कामे करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.”