(रत्नागिरी)
रत्नागिरीमध्ये क्रिप्टो करन्सीमधून कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवरील ओळखीतून विश्वास संपादन करत ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे रत्नागिरी शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात दुकान आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक या समाजमाध्यमावरून त्यांची सुहानी शर्मा नावाच्या महिलेबरोबर ओळख झाली. सुरुवातीला साध्या संवादातून मैत्री वाढवत सुहानी हिने तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. यानंतर सुहानी हिने आपला मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटमधील ‘ट्रस्ट इन कॉइन’ या वेब ॲप्लिकेशनचा वरिष्ठ अकाऊंट मॅनेजर असल्याची माहिती दिली. डॅनियल हा यूएसडीटी ट्रेडिंगच्या माध्यमातून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देतो, असे आमिष तिने तक्रारदारांना दाखवले.
या आमिषाला बळी पडून तक्रारदारांनी डॅनियलशी संपर्क साधला. डॅनियलने व्हॉट्सॲपद्वारे लिंक पाठवून ‘ट्रस्ट इन कॉइन’ या ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन करून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी विविध खात्यांमध्ये एकूण ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये जमा करून घेण्यात आले.
सुरुवातीला गुंतवणूक वाढताना दिसत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा मिळत नसल्याचे आणि केवळ पैसे मागितले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी डॅनियल आणि सुहानी शर्मा या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(क) व ६६(ड) नुसार गुन्हा दाखल केला असून, ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार नेमका कसा रचण्यात आला, याचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, क्रिप्टो करन्सी आणि ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली वाढत असलेल्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवरील ओळखी, अनोळखी ॲप्स आणि झटपट नफ्याच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

