( संगमेश्वर / प्रतिनिधी )
शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी कला – क्रिडा क्षेत्रातही चमकावेत यासाठी शाळास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धातूनच क्रिडा नैपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून येते . ग्रामीण भागातील विद्यार्थी शरीराने काटक असतात . अशा विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊ शकतात. विद्यार्थ्यांमधील खेळाचे असे वेगळे गुण हेरण्याचे काम पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या क्रिडा विभागाने केले असून यातूनच प्रजासत्ताक दिनी मुलींनी सादर केलेले बहारदार लेझीम नृत्य पाहून उपस्थित पाहुणे मंडळी भारावून गेली . संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या लेझीम नृत्याचे भरभरुन कौतूक केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून उपस्थित संस्था पदाधिकारी आणि पाहुणे मंडळींसमोर इयत्ता मुलींनी नऊवारी साडी नेसत पारंपारिक वेशात लेझीम नृत्याचे विविध प्रकार सादर केले. लेझीम मधील विविध प्रकार आणि ठेका पाहून उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले. सध्या लेझीम हा नृत्य प्रकार सध्या लेझीम हा नृत्यप्रकार फारसा पाहायला मिळत नसताना पैसा पण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केल्याबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक नवनाथ खोचरे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
प्रारंभी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . विद्यार्थ्यांनी उत्तम संचलनाने उपस्थितांना मानवंदना दिली . प्रशालेतील विद्यार्थींनींनी देशभक्तीपर गीत सादर केले . पंचरंगी कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले . यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये , सह सचिव अनिल शिंदे , संदीप सुर्वे, रमेश झगडे, माजी शिक्षिका सौ. शुभांगी शिंदे, समीर शेरे , बाबा नारकर, जितेंद्र प्रसादे, नितीन शेट्ये, खान, मापारी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ.शुभांगी शिंदे यांनी निवृत्तीनंतर पाच पुस्तकांचे लेखन केल्याने आणि त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते त्यांचा शाल – श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शासकीय रेखाकला परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह कला विषयात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देवून सन्मानीत करण्यात आले. तालुका ते राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या क्रिशा इंदानी हिचा सन्मान करण्यात आला.
संगमेश्वर बाजारपेठेतून लेझीम नृत्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी बाजारपेठेत गेल्यानंतर विद्यार्थिनींचे लेझीम नृत्य पाहून व्यापारी मंडळींनी मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान केला. पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्यानंतर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले.
( छाया – मिनार झगडे, संगमेश्वर )

