(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी येथे नळपाणीपुरवठ्यातून कुजलेले जलचर प्राण्यांचे अवशेष आणि तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक पाहणीत पाणीपुरवठा यंत्रणेत काही दिवसांपूर्वी मृत झालेले जलचर प्राणी अडकले असावेत, त्यामुळे त्यांचे कुजलेले अवशेष नळावाटे घराघरात पोहोचत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे गंभीर पाणीजन्य आजार पसरण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना पुढील काही दिवस पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी नळपाणी न वापरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
या प्रकरणाची बातमी वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामविस्तार अधिकारी पारसे यांच्यासह वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक तातडीने निढलेवाडी गावात दाखल झाले. यामध्ये आरोग्य सहाय्यक प्रसाद घाटे, संदीप खेडस्कर, महेश मोघे, आरोग्य सेवक काशिनाथ पवार, आरोग्य सेविका शर्मिला बडद आणि आरोग्य स्वयंसेविका साक्षी गिते यांनी गावातील विविध भागांतील नळांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान काही ठिकाणी नळ सुरू करताच पाण्यासोबत कुजलेले अवशेष बाहेर येत असल्याचे स्पष्ट दिसून आले. पाण्याला असह्य दुर्गंधी येत असल्याने उपस्थित अधिकारी आणि ग्रामस्थ हादरून गेले.
आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ग्रामपंचायत प्रशासनाला पाणी शुद्धीकरणासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारी म्हणून नागरिकांना मेडिक्लोरच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या असून पुढील आठ दिवस नळपाणी पिण्यास आणि वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाणीपुरवठा जलवाहिनीची तपासणी करताना एका ठिकाणी जलवाहिनी उघडण्यात आली असता, मोठ्या आकाराचा, पूर्णतः कुजलेल्या अवस्थेतील जलचर प्राणी आढळून आला. हे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थ आणि कर्मचारी यांना मोठा धक्का बसला. यामुळे गावातील भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या दिवशीही काही नळांतून कुजलेले अवशेष आणि दुर्गंधीयुक्त पाणीच येत असल्याचे पुन्हा एकदा आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. “पुढील आठ दिवस पिण्याचे आणि दैनंदिन वापराचे पाणी कुठून मिळणार?” असा सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. पर्यायी सुरक्षित पाणीपुरवठ्याची तातडीने ठोस व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, असे दूषित पाणी वापरल्यास त्वचारोग, पोटदुखी, जंतुसंसर्ग, पॅरासिटिक आजार तसेच इतर गंभीर पाणीजन्य आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नळपाण्यातून कुजलेले अवशेष बाहेर येताना पाहून अनेक नागरिकांना तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक घरात पाणी साठवणे आणि मेडिक्लोरचा योग्य वापर करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, प्रशासनाने तातडीने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अधिक तीव्र होत आहे.

