( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडेच वाढलेल्या LPG गॅस टँकरच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता खळबळजनक हालचालीत उतरले आहे.
आरटीओ पथकाच्या मदतीने विशेष तपासणी मोहीम राबवली जात असून, LPG वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून झडती घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत टँकर वाहनांच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची वैधता, भारवाहन क्षमतेचा तपास, तसेच चालकांची ब्रेथ अनालायझरद्वारे अल्कोहोल टेस्ट करून योग्यतेची खातरजमा करण्यात येत आहे.
याशिवाय, करबुडे फाटा येथील भारत पेट्रोल पंपजवळील वाहनतळावर टँकर चालकांसाठी खास रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी RTO अधिकाऱ्यांनी चालकांना सुरक्षित वाहतूक, वेगमर्यादा, ब्रेकिंग सिस्टिम तपासणी, तसेच इंधन व वायू वाहतुकीच्या विशेष नियमावलीबाबत सखोल माहिती दिली. सुरक्षितता हीच जबाबदारी या भावनेतून रत्नागिरी RTO विभागाने घेतलेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रियाही आता उमटू लागल्या आहेत.