(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगण (वाकणवाडी) परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवार, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
संतोष यशवंत पवार (वय ३६, रा. सांडेलावगण वाकणवाडी, ता. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ राकेश यशवंत पवार यांनी जयगड पोलिसांना माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पवार हे अविवाहित होते आणि विभक्त अवस्थेत एकट्याने वास्तव्यास होते. सन २०१३ मध्ये झालेल्या अपघातात त्यांचा एक पाय निकामी झाला होता. त्यामुळे ते अपंगत्वाशी झुंज देत होते. तसेच त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी राकेश पवार हे संतोष राहत असलेल्या खोलीलगत असलेल्या देवघरात दिवा लावण्यासाठी गेले असता, संतोष खोलीत छताच्या वाशाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सांडेलावगण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

