(रत्नागिरी)
२०२६ च्या हंगामातील रत्नागिरीतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे बाजारात दाखल झाली असून, या पहिल्याच विक्रीत ३ डझन हापूस आंब्यांच्या पेटीला तब्बल १२ हजार रुपये दर मिळाला आहे. यामुळे यंदाच्या हापूस हंगामाची उत्साहवर्धक सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावातील आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या बागेतील ही पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील घाऊक बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आली होती. दर्जेदार आकार, नैसर्गिक पक्वता आणि खास रत्नागिरी हापूसचे वैशिष्ट्य यामुळे या पेटीला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी मिळाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी हापूसला बाजारात विशेष स्थान मिळत असल्याचे या पहिल्या विक्रीतून स्पष्ट झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा दर पाहता, पुढील काळात हापूस आंब्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करत आहेत. विशेषतः पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रत्नागिरी हापूसला मोठी पसंती दिली जाते.
यंदा हवामान तुलनेने काहीसे अनुकूल राहिल्याने उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. यामुळे या महिना अखेरीस हापूस आंब्याची आवक वाढेल आणि बाजारपेठेत चांगले दर टिकून राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरीतील पहिल्या हापूसला मिळालेल्या या दरामुळे संपूर्ण कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले असून, २०२६ चा हापूस हंगाम समाधानकारक ठरेल, असा विश्वास बळावला आहे.

