(मुंबई)
परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे, मात्र यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. यापूर्वी मार्च २०२५, एप्रिल २०२५ आणि जून २०२५ अशा तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पण आता परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, १५ ऑगस्टनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट दंडात्मक कारवाई होणार आहे, ज्यामध्ये ₹१,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
HSRP बसवण्याच्या प्रक्रियेला अनेक अडचणींमुळे गती मिळाली नाही. महाराष्ट्रात २.१ कोटी वाहनांना HSRP आवश्यक आहे, मात्र आतापर्यंत केवळ २३ लाख वाहनांवरच प्लेट्स बसवल्या गेल्या आहेत. ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील प्रचंड गर्दी, मर्यादित प्लेट्सची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी (दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि खासगी) HSRP कायद्याने बंधनकारक आहे. या प्लेट्समध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-एच्ड युनिक आयडी, नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक आणि टॅम्पर-प्रूफ सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत नवीन वाहनांवर या प्लेट्स आधीच बसवलेल्या असतात.
नोंदणी प्रक्रियेसाठी वाहनधारकांनी www.transport.maharashtra.gov.in किंवा www.bookmyhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, आपल्या नोंदणीच्या आधारे योग्य RTO कोड निवडावा, नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाइल नंबर टाकून तपशील भरावेत, नजीकच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट बुक करावी, दुचाकीसाठी ₹५३१, तिनचाकीसाठी ₹५०० आणि चारचाकीसाठी ₹७४५ (GST सह) फी भरावी, तसेच होम डिलिव्हरीसाठी दुचाकीसाठी ₹१२५ आणि चारचाकीसाठी ₹२५० अतिरिक्त शुल्क भरावे. ठरलेल्या दिवशी वाहनासह RC आणि ओळखपत्र घेऊन फिटमेंट सेंटरवर जावे.
१५ ऑगस्ट २०२५ नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत ₹१,००० ते ₹१०,००० दंड आकारला जाईल. मात्र, ज्यांनी १५ ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे आणि ज्यांची फिटमेंट तारीख नंतरची आहे, त्यांना दंड लागणार नाही.