(रत्नागिरी / प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ई-सिगारेटच्या व्यसनाने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे सावट निर्माण झाले असतानाच, रत्नागिरी शहर पोलिसांनी या समस्येवर करारी घाव घालत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या तेली आळी नाका परिसरातील जय गगनगिरी जनरल स्टोअरवर टाकलेल्या छाप्यात तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपयांच्या ६९ ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या असून, दुकानमालक गोविंद दिनेश गजरा (वय ३२) याला अटक करण्यात आली आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरातही आढळत असलेल्या या ई-सिगारेटविरोधात शिक्षकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याने विशेष पथक तयार करून कारवाईची रणनीती आखली होती. त्यानुसार सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलीस पथकाने संबंधित दुकानावर अचानक धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठा उघडकीस आणला. ही कारवाई ई-सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ मधील कलम ७ आणि ८ अंतर्गत करण्यात आली. या कायद्यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, साठा, वाहतूक आणि जाहिरात पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, तसेच पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष पथकात पो.उ.नि. सागर शिंदे, सपोफौ दीपक साळवी, पोहवा अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, प्रशांत पाटील, पोकॉ अमित पालवे, महिला पो.कॉ. मोहिनी चिनके, आणि महिला पो.हे.कॉ. सोनल शिवलकर यांचा सक्रिय सहभाग होता.