(चंद्रपूर)
राज्यात नगरपरिषद निवडणुकांत भाजपला मोठे यश मिळाले असले, तरी चंद्रपूरमधील पराभवामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याने मुनगंटीवार आक्रमक झाले असून, त्यांनी थेट पक्षाच्या धोरणांवर आणि वरिष्ठ नेतृत्वावर निशाणा साधला आहे.
विदर्भात १०० पैकी ५५ जागांवर भाजपने विजय मिळवला असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यात चित्र पूर्णपणे वेगळे आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी ८ ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली, तर भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. स्वतःच्या जिल्ह्यातील हा पराभव मुनगंटीवारांच्या जिव्हारी लागला असून, ‘दरवाजे उघडून बाहेरच्यांना पक्षात घेतल्याचा हा परिणाम’ असल्याचे म्हणत त्यांनी भाजपच्या इनकमिंग धोरणावर टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत पक्षाच्या धोरणावर भूमिका मांडली होती. मात्र, निकालानंतर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट आणि परखड शब्दांत आपली भूमिका मांडत मंत्रिपदाच्या वाटपावर आणि पक्षातील निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मंत्रिपद नसण्याचा आणि निवडणूक पराभवाचा थेट संबंध नसतो’ असे सांगत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. यावर मुनगंटीवारांनी बोचरे प्रत्युत्तर दिले. “आज बावनकुळे साहेबांना असे वाटणे साहजिक आहे. पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असंच वाटत होतं,” असे म्हणत त्यांनी थेट टोला लगावला.
“मुख्यमंत्रिपदही येतं आणि जातं”
आपली भूमिका अधिक ठाम करताना मुनगंटीवार म्हणाले, “मी कधीच नाराज नसतो. मला मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी नाही, पण ती जनतेमध्ये आहे. मंत्रिपद येतं आणि जातं. मुख्यमंत्रिपदही येतं आणि जातं. कोणीही कायमस्वरूपी मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नसतो.” मुनगंटीवारांच्या या विधानामुळे भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली असून, चंद्रपूरच्या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.
भाजपमध्ये मुनगंटीवार ‘नवे खडसे’ ठरणार?
राज्यात क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपमध्ये एकेकाळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बाबतीत जे घडले, तशीच परिस्थिती आता सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीत निर्माण होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. मुनगंटीवार स्वतःला खडसेंच्या भूमिकेत ढकलत आहेत का आणि त्यामुळे त्यांचा राजकीय तोटा तर होत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यांतील मुनगंटीवारांची विधाने आणि भूमिका पाहता, त्यांच्या तोफेचा रोख विरोधकांपेक्षा आपल्या पक्षातील नेतृत्वाकडे अधिक असल्याचे स्पष्ट दिसते. चंद्रपूर, मूल आणि बल्लारपूरमधील पराभवानंतर मुनगंटीवार यांनी थेट पक्षावर गंभीर आरोप करत आपल्याला जाणीवपूर्वक शक्तिविहीन केल्याचा दावा केला. विधानसभा निवडणुकीत सलग सातव्यांदा विजय मिळवूनही यंदा मंत्रिपदापासून दूर ठेवले गेल्याचे शल्य त्यांनी उघडपणे व्यक्त केले.
या वक्तव्यानंतरही मुनगंटीवार थांबले नाहीत. दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा वेगळ्या शब्दांत नाराजी व्यक्त करत राज्यातील भाजप नेतृत्वाला सूचक इशारा दिला. भाजपमधील नाराज नेत्यांना एकत्र बांधण्याचे संकेत त्यांनी दिल्याने पक्षांतर्गत राजकारण अधिक तापले आहे.
या घडामोडी पाहता २०१४ ते २०१९ या काळात एकनाथ खडसे यांच्या बाबतीत जे घडले, त्याच दिशेने मुनगंटीवारांची वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये असूनही मुनगंटीवार एका प्रकारे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही मुनगंटीवार याच भूमिकेत दिसले. कधी त्यांनी महायुती सरकारच्या नवख्या मंत्र्यांना नियमांच्या कचाट्यात अडकवले, तर कधी सभागृहात ज्येष्ठ मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करून सरकारला घरचा आहेर दिला. राज्यात गाजलेल्या बिबट्यांच्या प्रकरणात तर त्यांनी विद्यमान वनमंत्री आणि त्यांच्या विभागावर तीव्र शब्दांत टीका करत संपूर्ण यंत्रणेचीच कोंडी केली.
या पार्श्वभूमीवर, भाजपमधील मुनगंटीवारांची भूमिका ही पक्षांतर्गत दबावाची रणनीती आहे की आत्मघातकी राजकीय वाटचाल, याबाबतची चर्चा येत्या काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

