(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कालच्या विधानभवनात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. आमदार आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्यांना विधानभवनाबाहेर नेले जात असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. यामुळे सरकारी कामात अडथळा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून आव्हाड विरुद्ध पडळकर असा राजकीय संघर्ष रंगला आहे. काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या वादात पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, घटनेनंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.