(मुंबई)
अनेक ठिकाणी पाळीव प्राणी हे घरातील सदस्यांप्रमाणे जिवलग मानले जातात. पण हे निष्ठावान सोबती आजार, अपघात किंवा वार्धक्यामुळे दगावल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबीयांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता मात्र या समस्येवर मार्ग निघाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने माजीवाडा (ठाणे) येथे महाराष्ट्रातील पहिली पाळीव प्राण्यांसाठी गॅस स्मशानभूमी उभारण्यात आली आहे.
पाळीव प्राण्यांच्या शेवटच्या प्रवासाला सन्मान मिळावा या उद्देशाने या स्वतंत्र स्मशानभूमीची उभारणी करण्यात आली आहे. या प्राणी स्मशानभूमीचे उद्घाटन शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप रोडे, कार्यकारी अभियंता संजय कदम, माजी नगरसेवक संजय भोईर, प्राणी मित्र संघटनेच्या सोनाली सजननी तसेच ठाण्यातील अनेक प्राणीप्रेमी उपस्थित होते.
मुक्या प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी असावी, ही संकल्पना पूर्वी मांडण्यात आली होती. आता ती प्रत्यक्षात साकार झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील पहिली अत्याधुनिक गॅसदाहिनी असलेल्या या स्मशानभूमीचे लोकार्पण माजीवाडा गाव परिसरात १६ नोव्हेंबर रोजी पार पडले.
प्रदूषणमुक्त आणि आधुनिक सुविधा
या स्मशानभूमीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुमारे ३० मीटर उंचीची चिमणी बसवली आहे. या चिमणीमुळे सुमारे ७० टक्के प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत होते. परिसर शांत, स्वच्छ आणि धूरमुक्त ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
स्थळी नातेवाईकांसाठी बसण्याची सुयोग्य व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी रजिस्टर ऑफिस, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराजवळ महादेवाचे मंदिरही बांधण्यात आले असून, या सर्व सोयी-सुविधांमुळे पाळीव प्राण्यांना आदरपूर्वक आणि शांत वातावरणात शेवटचा निरोप देणे आता शक्य झाले आहे.

