(कोल्हापूर)
नांदणी मठातील प्रसिद्ध महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा हत्ती अभयारण्यात पाठवण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून, रविवारी नांदणीहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्राही काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना स्पष्ट केलं की, “महादेवी हत्तीणीला वनतारात पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाचा नाही.”
“सरकारचा काहीही संबंध नाही, निर्णय न्यायालयाचा” — मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी महादेवी हत्तीणीच्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ही कारवाई कोणत्याही शासकीय आदेशाअंतर्गत झालेली नाही. काही तक्रारींवरून मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. प्राण्यांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने हत्तीणीला वनतारामध्ये हलवण्याचा निर्णय दिला,” असं फडणवीस म्हणाले. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, त्यामुळे महादेवी हत्तीणीला वनतारात ठेवण्याचा आदेश कायम राहिला.
“राज्य शासनाची यामध्ये कोणतीही भूमिका नसली, तरी या निर्णयामुळे कोल्हापूरमध्ये रोष आहे. स्थानिक लोकभावना, श्रद्धा आणि महादेवी हत्तीणीबाबतचा भावनिक संबंध लक्षात घेऊन मंगळवारी या प्रकरणावर कायदेशीर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
तसेच ते म्हणाले, “हत्तीणीला त्रास होत असल्याच्या काही तक्रारी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात हत्तीणीच्या हिताच्या दृष्टीने तिला हत्ती अभयारण्यात हलवणं आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. राज्यात हत्तींसाठी स्वतंत्र अभयारण्य नसल्यामुळे तिला गुजरातमधील वनतारात हलवण्यात आलं.”
प्रकरण नेमकं काय आहे?
प्राणी हक्क संघटना PETA ने महादेवी हत्तीणीचा मिरवणुकांमध्ये परवानगीशिवाय वापर केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर न्यायालयाने तपासासाठी समिती नेमली. या समितीने हत्तीणीची पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर केला. त्यामध्ये प्राण्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत, हत्तीणीला सुरक्षित पर्यावरणात ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले.
या निर्णयाविरोधात कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि भाविकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रविवारी नांदणीहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्राही काढण्यात आली. या पदयात्रेला रविवारी पहाटे नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली-कोल्हापूर महामार्गाने शिरोली फाटा, पुणे-बंगळूरु महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पोहचली. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. ‘एक रविवार माधुरीसाठी’ असं म्हणत नागरिक मोठ्या संख्येने या मूक पदयात्रेत सहभागी झाले होते. हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.