(चिपळूण / प्रतिनिधी)
शहरातील कावीळतळी येथे मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री झालेल्या भीषण अपघातात रमेश धोंडू कलकुटकी (वय ५०) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. इनोव्हा क्रिस्टा कारने जोरदार धडक दिल्यानंतर संबंधित चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने चिपळुणात संतापाची लाट उसळली.
अपघात रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडला. कलकुटकी हे रस्त्याच्या कडेकडेने चालत असताना खेर्डीकडे जाणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक MH08-BE-6821) गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी होत जागीच गतप्राण झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून उपस्थित नागरिकही सुन्न झाले.
घटनेनंतर चालक अभिजित जयंद्रथ खताते याने कुठलीही मदत न करता पळ काढला, यामुळे संतप्त नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली. अशा अमानुष कृत्यावर संताप व्यक्त करत ग्रामस्थ व मृताच्या नातेवाइकांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, सुरुवातीला या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे येईना. अखेर, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री उशिरा चालक अभिजित खताते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील वाहतूक शिस्त, भरधाव वाहनांचा वेग आणि अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळण्याच्या प्रश्नांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस अधिक तपास करत असून, गंभीर स्वरूपाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणाऱ्या चालकावर कठोर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरत आहे.