(नवी दिल्ली)
केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर देशात सुरक्षिततेचा दावा केला जात असतानाही, त्यासोबत अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ऑपरेशन सुरू आपण केलं, मात्र सैनिकांना अपमानास सामोरं जावं लागतं,” अशा शब्दांत शिंदेंनी सुरुवात केली. “एखाद्या दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष अचानक सांगतो की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपलं आहे, हे वक्तव्य कुठल्या आधारावर केलं जातं? त्याला आधार काय? हे ठरवण्याचा अधिकार भारताच्या निवडून आलेल्या सरकारला आहे की दुसऱ्या देशाच्या नेत्यांना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाही?”
संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सरकारच्या मौनावरही शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “विरोधक प्रश्न विचारतात, पण सरकार उत्तरे देत नाही. का?” असा सवाल करत त्यांनी पुढे विचारलं, “किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला? कुठे झाला? किती अड्डे उद्ध्वस्त झाले? – याबाबत सरकार माहिती का देत नाही?” त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेत “सर्व काही अंधारात ठेवण्याचं धोरण का?” असं म्हणत पारदर्शकतेच्या अभावावर बोट ठेवलं.
“हल्ला झाल्यावर सभा, सैनिकांचा अपमान”
प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत म्हटलं, “जर सरकार खरंच गंभीर असतं, तर इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असती. मात्र त्याऐवजी पंतप्रधान एका राजकीय सभेला उपस्थित राहतात – हे अत्यंत दुर्दैवी आहे.” तसेच, “जेव्हा पंतप्रधान असं म्हणतात की सेनेतील सैनिकांपेक्षा एक व्यापारी अधिक साहसी असतो, तेव्हा आम्ही त्यांच्याकडून देशरक्षणाविषयी काय अपेक्षा बाळगायच्या?” असा रोखठोक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत सरकारकडून ‘जश्न’ साजरा केल्याच्या घोषणांवरही शिंदेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “आखेर कशाचा जश्न? दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष सांगतो की युद्ध संपलं, आणि आपण जल्लोष करायचा? की आपल्या जवानांना न्याय मिळाला नाही याचाच आनंद मानायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
“दहशतवाद्यांना उत्तर देता येत नसेल, तर सत्ता सोडा!”
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं, “जर दहशतवादी हल्ल्यांनंतर सरकारकडून ठोस उत्तर दिलं जात नसेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तात्काळ खुर्ची खाली करावी.” शिंदेंच्या या भाषणामुळे संसदेत काही काळ वातावरण तापलं. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून आक्षेप नोंदवण्यात आला असला, तरी काँग्रेससह अनेक विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला.