(रायगड)
रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, रोहा तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे. बकरी चरण्यासाठी माळरानावर गेलेल्या २८ वर्षीय महिलेसोबत जबरदस्ती आणि मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला.
ही घटना दिनांक ३ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिला आपल्या बकऱ्या घेऊन गावाजवळील माळरानावर गेली असता, तिथे ताम्हणशेत येथील आदिवासी वाडीत राहणारा आरोपी रवि (पूर्ण नावाची नोंद नाही) तिच्या जवळ आला. त्याने अश्लील भाषेत बोलून या महिलेला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पीडितेला जमिनीवर ढकलून कपडे फाडण्याचा प्रयत्न करत तोंड दाबून मारहाण केली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने जोरात आरडाओरडा केला. आवाज ऐकू जाईल, अशी भीती वाटल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, प्राथमिक उपचारानंतर तिने आपल्या बहिणीकडे जाऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर रोहा पोलिस ठाण्यात ४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गु.र.नं. १३७/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४ (शारीरिक छळ), ७६ (महिलेला उद्देशून असभ्य कृत्य) आणि ११५(२) (शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.