(रत्नागिरी)
काँग्रेस पक्षाची विचारधारा कायम आहे. मात्र, कार्यपद्धतीत बदल झाला आहे. आता उणीदुणी काढणे बंद करा. मी पक्षासाठी काय केले, याचा विचार करा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. यापुढे जिल्ह्यात विधानसभानिहाय कार्यकर्ता शिबिर घेऊन पक्षाला बळकटी दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. बुधवार, ८ ऑगस्ट रोजी काँग्रेस भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, नवनिर्वाचित दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव, जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेश कीर यांनी पक्षसंघटना वाढीसाठी मार्गदर्शन केले. मागे काय झाले, यावर न बोलता भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार सर्वांनी करा. विधानसभानिहाय बीएलए आणि बूथप्रमुख यांच्या नियुक्त्या दोन महिन्यांच्या आत झाल्या पाहिजेत. यासाठी जिल्हाध्यक्षांनी समन्वयाने कामाला सुरुवात केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
माजी आमदार खलिफे यांनी सांगितले की, आता काँग्रेसची धुरा महिलांच्या हातीही आली आहे. काँग्रेस कधीच संपणार नाही. येणारे दिवस हे आपलेच आहेत. काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी भाजपला ७० वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे भाजपचे हे सरकार अधिक काळ टिकणार नाही. देशासह राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असेही त्या म्हणाल्या.
प्रदेश सरचिटणीस रमेश कीर आणि हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, सोनललक्ष्मी घाग, तसेच नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचे सत्कार यावेळी करण्यात आले. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षवाढीचे आश्वासन देत लवकरच जिल्ह्यात बदल झालेला पहायला मिळेल, असा शब्द यावेळी दिला.
….तर रस्ता रोको करणार
गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी न झाल्यास महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी दिला. १७/१८ वर्षे रखडलेल्या महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. गणेशोत्सवादरम्यान वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे तातडीने महामार्ग दुरुस्त व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.