(मालवण)
मालवणमध्ये नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रीती केळूसकर उर्फ सौभाग्यश्वरी गोवेकर (वय- ३५, रा. धुरीवाडा) या विवाहितेवर पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी तिचा घटस्फोटीत पती सुशांत सहदेव गोवेकर (वय-४०, रा. धुरीवाडा) याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कुंभारमाठ येथून ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
मालवण एसटी बसस्थानक परिसरात ही घटना घडली आहे. प्रीती या एका शॉपमध्ये काम करत असताना पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे धुरीवाडा येथील एका व्यक्तीसोबत लग्न झाले होते. मात्र त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेने अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. याचा राग तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मनात होता. या रागातूनच तो ती काम करत असलेल्या लॅबमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली होती. त्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले. त्यानंतर हातातील लायटरने तिला आग लावली. तिने लगेच पेट घेतला. त्यानंतर तो पळून गेला.
आग लागल्याने प्रीती आरडाओरड करत लॅब बाहेर आली. शेवटी पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर सैरभैर धावत सुटली. त्यावेळी तिथे उभे असलेले लोकही घाबरून गेले. त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवली. त्यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. लगेचच तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री तिचे निधन झाले.
‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या ; बाहेर सापडला तर त्यालाही जिवंत जाळणार !
धुरीवाडा येथील पूजा केळूसकर उर्फ सौभाग्यश्वरी गोवेकर या विवाहितेवर भरदिवसा मालवण बस स्थानका समोर पेट्रोल ओतून जाळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला वर्ग आक्रमक बनला आहे. गुरुवारी शहरातील सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येत हे कृत्य करणाऱ्या तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट कोर्टमध्ये दाखल करावे, यात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यांचाही शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले.
पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला असून काल सायंकाळी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. आज (शुक्रवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.