( मुंबई )
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमधील शेकापच्या सभेत बोलताना रायगड जिल्ह्यातील अनधिकृत डान्स बारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. “छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहू शकतात?” असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासन व पोलीस यंत्रणेला केला होता. मराठी जनतेच्या हक्कांच्या संदर्भात राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच, त्यांनी पनवेलमध्ये वाढत्या डान्सबार संस्कृतीवर टीका केली. त्यांच्या या भाषणानंतरच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि लगेचच ‘नाईट रायडर’ बारवर धडक देत, तिथे मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. रात्री उशिरा मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल तालुक्यातील कोन गावातील या लेडीज सर्व्हिस बारवर दगडफेक करत तोडफोड केली.
या घटनेत बारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या प्रकरणी काही मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पनवेल पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, योगेश चिले यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे. या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत नाही, तर राजकीय दृष्टिकोनातूनही संवेदनशील मानली जात आहे. आगामी काळात यासंदर्भात राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आणि पोलिसांची कार्यवाही काय होते, याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“राज साहेबांचा मुद्दा आमच्यासाठी आदेशच” – संदीप देशपांडे
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “जेव्हा राज साहेब एखादा मुद्दा मांडतात, तेव्हा महाराष्ट्र सैनिक त्याची अंमलबजावणी करत असतात. त्यामुळे पनवेलमधील कारवाई ही त्याच मुद्द्याची अंमलबजावणी होती. जे बार अनधिकृत आहेत, ते सरकारने बंद केले पाहिजेत. आम्ही का तोडायचं? सरकार काय झोपलंय का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.