(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत पहिले संकेत आता स्पष्ट झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा होती. त्याचे पहिले पाऊल मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे.
१८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी युतीची औपचारिक घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेने आणि राज ठाकरे यांच्या कर्मचारी सेनेने ‘उत्कर्ष पॅनल’ अंतर्गत एकत्रितपणे ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
ही युती केवळ एक पतपेढीपुरती मर्यादित न राहता, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक व्यापक स्वरूप धारण करू शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेस्ट पतपेढी मध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळं कामगारांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार आहे.
गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये ही पहिलीच निवडणूक युती असल्याने, या घडामोडीला राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. आगामी निवडणुकांमध्ये ही युती अधिक बळकट होणार की केवळ तात्पुरती युती म्हणून संपणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.