(जळगाव)
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करून जंगलात पुरून टाकले. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अनिल संदानशिव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आता तपासादरम्यान धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची हत्या करणाऱ्या आरोपीचे इतर अनेक महिलांशीही फोनवर संभाषण झाल्याचे समोर आले आहे. आरोपीचे सीडीआर काढल्यानंतर त्याने अनेक महिलांशी दीर्घकाळ संवाद साधल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपीने अशाप्रकारे महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची हत्या केली आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अनिल संदानशिव याने ज्या महिलांशी संपर्क साधला, त्या आज जिवंत आहेत का, त्यांचा थांगपत्ता कुठे आहे, की त्यांनाही मारण्यात आले आहे, याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आरोपीचा महिलांशी संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता, याचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. आरोपी महिलांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत असल्याही माहितीही पोलिसाना मिळाली आहे. शिवाय, आरोपीने आणखी काही गुन्ह्यांची कबुली पोलिसांकडे केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना नुसतीच समोर आली होती. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली. आरोपी अनिल संदानशिव याला पोलिसांनी अटक केली असून तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तो विवाहित महिलांना लक्ष्य करायचा. सुरुवातीला गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांना जंगलात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांची हत्या करायचा. पोलिसांना सध्या दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, मात्र तपासातून आणखी गुन्ह्यांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.