(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बृहन्मुंबईत सहायक पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर शैलेश दत्तात्रय सणस यांची खेड उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
शैलेश सणस यांनी यापूर्वी रत्नागिरीत शहर पोलिस निरीक्षक म्हणून सुमारे सहा महिने कार्य केले असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सावकारीविरोधात धडक मोहीम राबवली होती. बेकायदेशीर सावकारी व्यवसायाची मुळे उखडून टाकण्याची भूमिका त्यांनी बजावली होती. त्यांच्या कडक कारवाईमुळे सावकारांच्या अवैध साखळ्यांना तडा गेला होता, परिणामी शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या कारवाईमुळे काहींना तीव्र नाराजी देखील वाटली होती, मात्र कायद्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात ते यशस्वी ठरले होते.
तसेच, सणस यांनी रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत आठ महिने कार्यरत राहून गुन्हेगारीविरोधात विश्लेषणात्मक कामगिरी बजावली होती. तपशीलवार माहिती संकलन, गुप्त वार्तांकन आणि सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आता खेड उपविभागीय पोलिस अधिकारी या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा कोकणात काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्याकडून प्रभावी कारवाई आणि प्रशासनात कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त होत आहे.