( पुणे )
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड (एफसी रोड) परिसरामधील काही दुकाने ‘लव्ह जिहाद’चे केंद्र बनली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ‘एफसी रोड पॅटर्न’च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
स्वस्त कपड्यांच्या आमीषाने मुलींना जाळ्यात ओढलं जातं
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर म्हणाले, “एफसी रोड परिसरात लव्ह जिहादचं नवं रॅकेट सुरू आहे. इतर ठिकाणी ४०० रुपयांना मिळणारा ड्रेस येथे केवळ २०० रुपयांना मिळतो. त्यामुळे अनेक हिंदू मुली त्या दुकानांकडे आकर्षित होतात. एकदा शंभर मुलींची माहिती जमा झाली की, त्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं.” त्यांनी हा दावा काही तरुणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचंही नमूद केलं.
प्रेमाच्या आमिषाने धर्मांतर व शोषण
पडळकर पुढे म्हणाले की, केवळ कपडे स्वस्त विकणं हा हेतू नसून, त्या निमित्ताने मुलींचा संपर्क मिळवून त्यांना खोट्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या आमिषाने फसवले जाते. हे केवळ वैयक्तिक संबंध नाहीत, तर हिंदू मुलींना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांचं धर्मांतर घडवून आणण्याचं एक संगठित षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारांमुळे समाजात चिंता वाढली असून, पालकांनी आपल्या मुलींच्या हालचालींवर आणि मैत्रीच्या वर्तुळावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं पडळकरांनी सांगितलं. “ही फक्त संस्कृतीची नव्हे तर भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे,” असं ते म्हणाले.ले
या आरोपांमुळे पुणे पोलिस आणि प्रशासनासमोर नव्या तपासाची गरज उभी ठाकली आहे. मात्र, या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्रशासनाकडून आलेली नाही. काही सामाजिक संघटनांनी या प्रकारांची गंभीर चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.

