(मुंबई)
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी घेतला आहे. मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. या भेटीवेळी आमदार सुरेश धस उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित निर्णय घेत आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. या पथकामध्ये पीएसआय संतोष साबळे यांचाही समावेश करण्यात आला आहे. परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली होती, मात्र या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी उपोषण व आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते.
गुरुवारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची तिन्ही मुले, वडील दत्तात्रय मुंडे, आई चंद्रकला मुंडे आणि ज्ञानेश्वरींचे भाऊ सतीश फड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. या भेटीत त्यांनी स्पष्टपणे आरोपींना तत्काळ अटक करण्याची, तसेच पंकज कुमावत व संतोष साबळे यांचा तपास पथकामध्ये समावेश करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी भेटीनंतर त्वरित कारवाई करत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. फडणवीस यांनी कुटुंबीयांना धीर देताना सांगितले की या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस महासंचालकांना कॉल करून आदेश दिले की संबंधित सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. “तुम्हाला जे अधिकारी हवेत ते सर्व दिले जातील,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले की, “महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेले २१ महिने आम्ही जे काही अनुभवले ते सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. सर्व ऐकून मुख्यमंत्री भावूक झाले. त्यांनी कोणालाही पाठिशी न घालण्याचा शब्द दिला आणि एसआयटी नेमण्याचे आदेश तत्काळ दिले. बीडचे पोलीस अधीक्षक यांनाही त्वरित कॉल करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.”