(मुंबई)
मौजे आंबवली ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्यावतीने, तसेच महिला मंडळ मुंबई, अमर शक्ती क्रिकेट संघ आणि क्रीडा समिती आंबवली यांच्या सहकार्याने आयोजित “विद्यार्थी गुणगौरव सोहळा – २०२५” अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री. दौलत खांबे होते. यावेळी मंडळाचे शिल्पकार श्री. गणपत बाबा, अध्यक्ष श्री. रवींद्र रटाटे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद आंबवली शाळेचे माजी शिक्षक श्री. जगन्नाथ कोल्हे गुरुजी आणि श्री. हरिभाऊ डंबे गुरुजी हे कुटुंबीयांसह उपस्थित होते. यावेळी अनुक्रमे १२ आणि ६ वर्षे शाळेसाठी दिलेल्या त्यांच्या समर्पित योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत उपस्थित विद्यार्थी व पालकांना मौल्यवान मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात नर्सरीपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विविध स्तरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. राज्य आणि जिल्हा पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नेत्रा माळी हिला “प्रेरणा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
महिला मंडळातील सदस्यांचा हळदीकुंकू समारंभ व भेटवस्तू (वाण) देवून गौरव करण्यात आला. याशिवाय महिला व लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या सोहळ्याला ग्रामीण मंडळ, ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, तसेच मंडळाचे सर्व सभासद व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकजुटीने परिश्रम घेतल्याने शक्य झाले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.